सावित्रीबाईंस पत्र
प्रिय साऊ… जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. तुझा जन्माने आमच्या संपूर्ण स्त्रीवर्गाचा नवा जन्म झालाय इतका खास दिवस.. खुप दिवसांपासून तुझ्याशी बोलावं वाटतयं.. अगदी शाळेत असतांना तुझ्याबद्दल भाषण करायची तिथंपासून ते एमपीएससीचा अभ्यास करतांना गाठाळ सरांच्या पुस्तकात तुला वाचतांना मन भरून यायचं तेव्हापासून.. तुझ्यामुळेच करता आलं ग ते भाषण पण आणि एमपीसएससीचा नादपण.. तु आम्हा मुलींना काय दिलं नाहीस ? सगळं दिलसं - शिक्षण नावाचं प्रभावी शस्त्र देऊन “चूल आणि मूल”च्या बाहेर जाऊन पंख पसरवण्यासाठी विस्तीर्ण आकाश दिलसं..पंख पसरवण्याची संधी तुझ्यामुळे आम्हाला मिळाली.. मला तुझं खुप कौतुक वाटतं बाई. ते यासाठी ग वयाच्या नवव्या वर्षी फुले घराण्याची सून झालीस ,काहीतरी मनात घेऊन आली असशील ना सासरी पण जगण्याला “परिस” लाभावा तसे “ज्योतिबा” लाभले..तुला स्त्रीमुक्तीच्या चळवळीसाठी कोणी सज्ज केलं असेल तर ज्योतिबांनीच ना..? प्रत्येक सावित्रीला असे “ज्योतिबा”लाभले तर किती छान होईल ना ? अर्थात उलटही तितकंच खर की प्रत्येक ज्योतिबा ला “सावित्री”सारखी समर्थ साथ लाभली तर ..? कारण इतकं सोप्पं नक्कीच नव्हतं ...