सावित्रीबाईंस पत्र
प्रिय साऊ…
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
तुझा जन्माने आमच्या संपूर्ण स्त्रीवर्गाचा नवा जन्म झालाय इतका खास दिवस..
खुप दिवसांपासून तुझ्याशी बोलावं वाटतयं..
अगदी शाळेत असतांना तुझ्याबद्दल भाषण करायची तिथंपासून ते एमपीएससीचा अभ्यास करतांना गाठाळ सरांच्या पुस्तकात तुला वाचतांना मन भरून यायचं तेव्हापासून..
तुझ्यामुळेच करता आलं ग ते भाषण पण आणि एमपीसएससीचा नादपण..
तु आम्हा मुलींना काय दिलं नाहीस ? सगळं दिलसं - शिक्षण नावाचं प्रभावी शस्त्र देऊन “चूल आणि मूल”च्या बाहेर जाऊन पंख पसरवण्यासाठी विस्तीर्ण आकाश दिलसं..पंख पसरवण्याची संधी तुझ्यामुळे आम्हाला मिळाली..
मला तुझं खुप कौतुक वाटतं बाई.
ते यासाठी ग वयाच्या नवव्या वर्षी फुले घराण्याची सून झालीस ,काहीतरी मनात घेऊन आली असशील ना सासरी पण जगण्याला “परिस” लाभावा तसे “ज्योतिबा” लाभले..तुला स्त्रीमुक्तीच्या चळवळीसाठी कोणी सज्ज केलं असेल तर ज्योतिबांनीच ना..? प्रत्येक सावित्रीला असे “ज्योतिबा”लाभले तर किती छान होईल ना ? अर्थात उलटही तितकंच खर की प्रत्येक ज्योतिबा ला “सावित्री”सारखी समर्थ साथ लाभली तर ..? कारण इतकं सोप्पं नक्कीच नव्हतं ग समाजाचा विरोध पत्करून शेणं गोळे झेलत मुलींची शाळा भरवणं..तू कधीही कच खावू शकत होतीस पण तू तसं केल नाहीस ,नेटाने उभी राहिलीस..मला हासुद्धा प्रश्न पडतो ,तू आणि ज्योतिबा जेव्हा समाजाच्या प्रवाहाविरुद्द वाहत होता तेव्हा ज्योतिबांच्या वडलांनी तुम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा तु घाबरली कशी नाहीस ग? पतीच्या सर्वच क्रांतीकारी निर्णयामधे तू अगदीच समर्थ साथ दिलीस याच मला विशेष अप्रुप वाटतं ,सो कॅाल्ड समाजाच्या दबावाला तू बळी पडली नाहीस याचं मला मनोमन कौतुक वाटतं ..अस्पृश्यासाठी पाण्याचा हौद उघडून देतांना तुला नाही का भिती वाटली सासूची ,सासऱ्यांची आणि सो कॅाल्ड समाजाची ..? मुलींची शाळा काढायची म्हणून तू स्वतः आधी शिक्षण घेतलसं तेव्हा किती रोष ओढून असेल घरातल्यांचा आणि समाजाचाही आणि त्याही नंतर जेव्हा तू मुलींची शाळा काढलीस तेव्हा घरापासून ते शाळेपर्यंत जाईपर्यंत तुझ्यावर फेकले जाणारे शेणगोळे आणि शिव्यांची लाखोली कशी ग सहन केलीस? तुझ्या या निस्सीम त्यागापुढे निःशब्द व्हायला होतं बघ..तू खूप काही केलं आहेस आमच्यासाठी..विधवांचे केशवपण थांबविण्यासाठी तू न्हाव्यांचा संप घडवून आणलास आणि या छोट्याशा कृतीतून कितीतरी विधवांच्या दुःखी कष्टी आयुष्यावर आनंदाची छोटी फुंकर घालता आली ..बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करुन तेथील काशीबाई या विधवेचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले..प्रत्येक कृतीत समाजाला काही देण्याची वृत्ती तुझी ..तुझ्या लेकी सुना आज खुप पुढे गेल्यात तुझ्या या त्यागामुळे ..देशाच्या सर्वोच्च पदापासून ते समाजकारण ,राजकारण ,शिक्षण ,वैद्यकीय,अभियांत्रिकी ,अंतरिक्ष या सगळ्याच क्षेत्रात पुढे आहेत..तरीही अजूनही तुझी गरज आहेच असंही वाटतं बरं का..पितृसत्ताक समाजाची झूल आणि जातीचं खुळ काही कमी होईना..बाहेर जाऊन सावित्रीमाईबद्दल भाषण करायचं आणि घरी येऊन लेकीला करियर सोडून लग्नासाठी घाई करायची हे चित्र आजही आहे ग…तुला आणि ज्योतिबांना “माणुसकी”हीच जात कळायची फक्त पण आजही २१व्या शतकात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जात अधिकच गडद होत जातेय..सत्यशोधक पध्दतीने लग्न लावतांना घाबरलेल्या वर वधूंना आधार द्यायचं काम करतांना तुला किती धीरांना घ्यावं लागतं असेल ना ? जॅान वॅार्डन यांनी जेव्हा तुझ्या शाळेला भेट दिली तेव्हा ज्योतिबांकडे तुझे केलेलं कौतुक त्यांना त्यांच्या सर्व प्रयत्नांच फलश्रुतच वाटलं असेल नक्कीच..तुझ्याकडे एक हट्ट करायचा आहे पुढच्या एखाद्या जन्मी तुझ्या मुलींच्या पहिल्या शाळेतील विद्यार्थिनी व्हायचं आहे मला ..बघायचं आहे कशी ती साऊ आणि तिचं जगणं ..जिने आमच्या सारख्या अनेक कळ्या खुलवल्या आहेत..तुझा वसा १% तरी पुढे नेता आला तरी जन्माच सार्थक समजेल ..”साऊची लेक”असं सार्थपणे म्हणता यावं यासाठी बळ दे ,बाकी आज जी आहे ती केवळ तुझ्यामुळेच..तव तेजाचा अन् धैर्याचा अंश दे…
बाकी खुप छान वाटतयं तुझ्याशी मनमोकळं बोलुन आज..काळजी घे आणि चूकभूल द्यावी घ्यावी .
तुझीच एक लेक
~~ पुनवेच्या शब्दशलाका
#आयुष्याच्या डायरीचं कृतज्ञतेचं पान
आवडलं....
ReplyDelete