जरा विसावू ह्या वळणावर-- ट्रेनिंग डायरी
" _याच साठी केला होता अट्टाहास_"म्हणत फायनली तो दिवस उजाडला..प्रत्येक जण अनेक अडथळ्यांची मालिका पार करून ह्या वणामतीच्या उंबरठयावर मोठ्या मोठ्या बॅगा आणि मनात प्रचंड उत्साह घेऊन आला ._"वो घडी आ गई आ गई_"अस म्हणत जोधपूरी आणि पांढरया साडीमधे वनामतीमधे एकच जल्लोष सुरू झाला आणि रुजू अहवाल लिहिताच, डोक्यावर असलेली स्टेची टांगती तलवार बाजूला सारून सगळे फोटोसेशन मोड मधे गेले की अगदी आता वनामती मधून निघेपर्यंत तसांच आहे तो फोटोझोन.. ट्रेनिंगच्या पहिल्या पंधरवाड्यात सगळ्याच बाबतीत उत्साह अगदी खच्चून भरलेला होता मग तो फोटो साठी, लेक्चर मधे असो की बाहेर फिरून नागपूर explore करण असो.महाराष्ट्रतल्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या ह्या "क्रीम टॅलेंट" इतका मोठा वेळ सोबत राहणं, चहा नाश्ता,जेवणासाठी टेबलवर गप्पा मारणं, लेक्चर मधे memes चा पाऊस पाडून पुन्हा कॉलेज लाईफ जगणं म्हणजे " _एक वेगळच जग आणि वेगळीच दुनियादारी"._ .ट्रेनिंग च्या ह्या दोन महिन्यातील एक सुंदर पर्व म्हणजे "अमरावती प्रबोधिनी" .खर तर ह्या दोन महिन्यात जे काही शिकलो ते तिथेच शिकलो अस म्हणू शिकतो.. प्रबोधिनी ने आम्हाला एक संस्था,एक संचालक आणि व्यवस्था म्हणून बरच काही शिकवलं.प्रबोधिनी डायरीमधील सुंदर पान म्हणजे "चिखलदरा ट्रीप".एवढे वेगवेगळे ठिकाण फिरण ,त्यापेक्षा फिरवण ह्यामागचा उदात्त हेतूही कधी कधी लक्षात यायचा निवांत बसून विचार केला की. प्रबोधिनीच्या बहारदर वातावरणाने सगळ्यांना भुरळ पाडली आणि ट्रेनिंगचा हेतू तिथे समजला. प्रबोधिनीच्या समारोपाप्रसंगी भरभरून बोलत अतिशय जड पावलांनी अमरावतीचा निरोप घेऊन आमचं वऱ्हाड पुन्हा वनामतीच्या दारी परतलं. त्याचवेळी आमचे काही सहकारी यशदासाठी रवाना झाले..त्यानंतरच्या पठारावस्थेत मात्र लेक्चरला झोपणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आणि वामकुक्षीच्या नावाने रुमला गेलेले डायरेक्ट संध्याकाळच्या चहा नाश्त्याला दिसू लागले..ह्या सगळ्यात जीवाला आधार म्हणून बडे सेलिब्रेशनचा जल्लोष,नाव घेण्याची अनोखी प्रथा, नवरात्री,गरबा आणि कोजागिरी ,दसरा...प्रत्येक होस्टेल चा इथे एक वेगळा वर्षा वाले त्यांच्या जगात, वाडा बॉईजच एक वेगळं भावविश्व--दसरा सण साजरा करून एक वेगळाच ट्रेंड सेट केला, LBSNAA च सुख नागपुरात अनुभवणारी जनता अजून वेगळीच..ह्या सगळ्या सावळ्या गोंधळात काहींना सातवा वेतन चौदावा करून घेण्याचे भाग्य लाभले..एकमेकांना अगदी अनोळखी असणारे सगळे एकमेकांच्या ओळखीचे होऊ लागले . केडरनुसार, जिल्ह्यानुसार ग्रूप्स तर होतेच पण CPTP8 ह्या शीर्षकाखाली मैत्री घट्ट होऊ लागली आणि कुठे तरी अवघा महाराष्ट्र आपला कसा ह्याचा प्रत्यय येऊ लागला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांशी ओळख झाली. तयारीच्या काळात मनाला खूप आवर घालत अभ्यासात कोंडून घेतलेल्या अधिकाऱ्यांनी पायाभूत प्रशिक्षणात स्वतःचे अगदी मनमुराद लाड पुरवून घेतले मग ते दर आठवड्याला movies ला जाणं असो की ट्रीप्स करणं असो.." _यह दर्द काहे खतम नही होता_ " म्हणत पुढे ठाकली ती Foundation ची परीक्षा
...पण आयुष्याची आणि एमपीएससीची एवढी कठीण पार केलेल्या अधिकाऱ्यानी ती लीलया पार पाडली आणि हुश्श फाउंडेशन ट्रेनिंगच घोड गंगेत न्हाले.. मग सुरू झालं attachment नावाचं प्रकरण..नावात जरी attachment असल तरी attach होण्याआधीच इथे detach व्हावं लागतं.मग काय मोर्चा वळला तो सेवाग्रामला-राष्ट्रपित्याच्या सान्निध्यात..तिथल्या वातावरणात निरीक्षणाने बरच काही शिकता आल. सेवाग्राम मधूनच cultural चे पडघम वाजू लागले आणि रात्री बॅचेसच्या मैफिली रंगू लागल्या आणि ह्यातूनच मैत्रीबंध आणखीच दृढ झाला .प्रत्येक बॅचचे विशेष वैशिष्टये मग कोणी टाळ्या वाजवन्यात,कोणी memes बनवण्यात तर कोणी वेगवेगळे आवाज काढण्यात तर कोणी रात्री मैफिली रंगवण्यात. मग काय ती कल्चरल कमिटीची धावपळ,काय ती जोरदार तयारी अगदी ओकेमधे सगळं आणि ह्या सगळ्यात जिव्हाळ्याच्या पगारासाठी आवश्यक बाबीसाठी धावाधाव..पुढे कल्चरच्या उत्साहात न्यायिक संलग्नता कशी पार पडली ह्याचा कोणाला मागमूसही लागला नाही. cultural च्या संध्याकाळपासून सगळ्यांना हे ट्रेनिंग इतक्या लवकर का संपलं असं वाटू लागलं,मनात भावना दाटी करू लागल्या..येताना अनोळखी असणारे अनेक चेहरे अनेक आयुष्यासाठी साथ देशील असे दोस्त,सहकारी,सुंदर आठवणी घेऊन जात होते..अखेर तो दिवस आला निरोपाचा..आज तो कॅम्पस,ती मेस,ती वर्षा,तो वाडा सगळा नवा भासत होता .थांबा ना थोड अजून अस म्हणत होता जणू..ह्या ठिकाणी पुन्हा कधी भेटणार नाही अस नाही पण फाउंडेशनचा फील काही वेगळाच...एवढ्या भरमसाट लेक्चर मधून काय शिकलो हा जरी प्रश्न असला तरी माणसांची मन वाचून बरच काही शिकता आलं हे मात्र नक्की शिकलो...पुस्तक वाचून जितकं ज्ञान मिळेल त्यापेक्षा जास्त ज्ञान माणसांची मन वाचली तर मिळेल असा काहीसा प्रत्यय..मग ते शिरभाते सरांचे व्यवस्थापन कौशल्य असो की अनिरुद्ध पाटील सरांचे संवाद फेक .आपल्यातही प्रत्येकाची एक खास स्टोरी नक्कीच आहे . प्रत्येकाचे नानाविध कलागुण आपण aspirant to officer कसे झालो हे दाखवत होते..मग ते सर अनमोल असो ज्यांनी अगदी थरारक अनुभव घेऊन जुन्या अनुभवांचा कोणताही बडेजाव न ठेवता नव्या ओळखीने मिक्स होण असेल की स्वत:च्या कामात इतका जीव ओतून महत्तम सामाजिक विकास साधत cultural चांगले पाडण्यासाठी झटणारा प्रमोद आणि सहकारी आणि अर्थात सगळ्यांना घेऊन चालणारे प्रमोद सर, केदारची फोटोग्राफी ,दिपालीच सगळ्या ठिकाणी पुढाकार घेऊन अनेक चांगले इव्हेंट घडवणे आणि त्यासाठी लागणारी धावपळ करण..मला विशेष कौतुक वाटायचं आमच्या संसारी महिला वर्गाच..सगळं सांभाळून एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली..घरची जबाबदारी तिकडे सोपवून इकडे अधिकारीनी म्हणून घडवण आणि त्यातही मृणाली आणि नमिता मॅम ने तर तिहेरी जबाबदाऱ्या मनापासून पार पाडत स्वतःला अधिकारीनी म्हणून सिद्ध करण्यात मैलाचा दगड नक्की गाठला आहे.प्रत्येकाबद्दल लिहीण इथे शक्य नाही पण भविष्यात आमची बॅच चांगल्या कामाच्या माध्यमातून मोहोर उमटवो की नेहमी अस लिहिता यावं.. aspirant to Officer च्या या पहिल्या टप्प्यात आम्ही बरच काही शिकलो..खऱ्या अर्थानं कंबाईन्ड ट्रेनिंगचा अर्थ थोडा तरी गवसू शिकलो.आता इथून पुढे प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होतील.मुक्काम बदलतील पण आज मनात आहे तो ओलावा कायम ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया.. पुढच्या काही वर्षात राज्याच्या प्रशासनाचा गाडा हाकायचा आहे त्यामुळे ही सर्वांमधील ही "बॅचमेट"फिलिंग कायम ठेवूया . पद आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एक समृद्ध जगण्यासाठी हे पायाभूत प्रशिक्षणाचे पान आयुष्याच्या डायरीत महत्वाचे वाटते.
©पुनम सुनंदा भिला अहिरे
परिविक्षाधीन कक्ष अधिकारी
*पल याद आयेंगे पल*
*प्रशिक्षण पर्व १ समाप्ती*
*प्रशासकीय पर्वातून*
अप्रतिम पूनम
ReplyDeleteCan I get your gmail/telegram?
ReplyDeleteI have some study related issues