उंच तिचा झोका
महिला दिन स्पेशल
“ उंच तिचा झोका”
खुप दिवसांपासून लिहायचं होतं या विषयावर … आजपेक्षा दुसरा कोणता मुहुर्त नसावा वाटतं लिहिण्याला..अनेक महिला प्रशिक्षणार्थी अधिकारिणींची हीच गोष्ट आहे ती मांडण्याचा छोटा प्रयत्न..राज्यभर जिच्या यशाचा डंका वाजतोय अशा एका अधिकारिणी मैत्रीणीचा प्रवास…..
तशी ती महाराष्ट्रातल्या स्त्रींच्या आकडेवारीत बर्यापैकी मागे असलेल्या जिल्ह्यातील …दहावी बारावीपर्यंत शिकल्यानतंर तिच्या सगळ्याच मैत्रिंणीची लग्न झालीत तसं हिचेही लग्न करुन टाका असं सुरु झाला..पण आईवडिल नेटाने तग धरुन राहिले आणि पोरीला इंजिनीअरींगला धाडली ..खरंतर त्यांचा हा निर्णय तिथल्या लोकांना क्रांतीकारी वाटत होता.. पोरीने इंजिनीअरींग पूर्ण केल्यावर तिच्या लग्नाचे वेध सगळ्यांना लागले आणि चांगल स्थळ बघून घरच्यांनी तिच्या लग्नाचा बार उडवून टाकला..पण लग्नानंतर तिच्या कर्तुत्वाला खरे पंख फुटले अगदी “जगण्याला पंख फुटले”गाण्याप्रमाणे”…लग्न करुन सुखी स्वप्न असणार्या एका गृहिणींचे रुपांतर एका दृढ निश्चयी अधिकारिणीत झालं..तशी ती अभ्यासात हुशार होती म्हणून पालकांनी इंजिनीअरिंगपर्यंत शिकू दिलं होतं..तिचे सासरे प्रशासनात होते ,त्यांच्याकडे पाहून तिला प्रशासनाबद्दल आकर्षण वाटले पण या “आकर्षणा”ला साथ मिळाली तिच्या “प्रेमाची”..तिच्या यजमानांनी तिच्यातील “खणखणीत वाजणारं नाणे”ओळखले होते..त्यामुळेच त्यांनी तिला छोट्या छोट्या गोष्टींत प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.. materialistic romanticism च्या काळात एकमेकांच्या क्षमता ओळखून एकमेकांच्या प्रगतीस पूरक बनणं हे खर्या प्रेमाचं मोठं लक्षण म्हणावं लागेल..पुरुषी अहंकार बाजूला ठेवून दरवेळी बायकोला एखादं मोठ्ठं स्वप्न दाखवणे ,त्यासाठी लागणारा आत्मविश्वास तिच्यात जागवणं आणि यश अपयशाच्या लपंडावात तिची पाठराखण करणं आणि तिला पुढे जाताना मनस्वी आनंदी होणं हे असं सगळं करणाऱ्या पुरुषांच कौतुक करावं तितकं कमी आहे ..आजच्या महिलादिनाबद्दल अशा अनेक पुरुषांनीही मानाचा मुजरा कारण “पाठी असते ग बाई,पुढे जातो गं पुरुष” या उक्तीला आता “पाठी असतो ग पुरुष,पुढे जाते ग बाई” असं अनेकदा बदलावं लागतं हे समाजातील सकारात्मक चित्र..तर त्याने तिला ते स्वप्न दाखवलं ,तिने त्यासाठी स्वतःला झोकून दिले.दरम्यानच्या काळात मुलीचा जन्म झाला तेव्हाही त्याने दुहेरी पालकत्व सांभाळत तिला अभ्यास जवळ करु दिला..छोट्या मोठ्या यशातून तावुन सुलाखून मोठ्या यशाला जणू धार लावणं सुरु होतं ..तिची परीक्षा ,मुलाखती या सगळ्यांत तो कमालीचा दक्ष असे ..त्यामुळे नवरा आणि मुलीकडे पाहून ती दरवेळी नेटाने लढायची आणि या सगळयांत तिला तिच्या “स्व”क्षमतांचा शोध लागला..तिच्यातील अधिकारिेणी आकारा येऊ लागली .कौटुंबिक जबाबदार्या ,अभ्यास ,पालकत्व असा तिहेरी डोलारा सांभाळून स्वप्नांचा पाठलागही सुरुच होता ..या संघर्षांच फलित २८ फेब्रुवारीच्या निकालात तिला मिळालं ..राज्यातून तृतीय अन् मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने ती पास झाली…तयारीच्या काळातील अश्रूंची फूले झाली .त्या दिवशी तिने टाकलेलं स्टेटस मनाला भावलं अगदी ते असं होते की “मीच ओलांडले मला ,सोबतीस माझा सखा,तुझ्या आशेच्या हिंदोळ्यावर झुले उंच माझा झोका” ..वाचून कृतकृत्य वाटलं अगदी…स्त्री शिक्षणाचा गंध नसणार्या एका खेड्यातील या तरुणीने सगळे सिध्दांत मागे ठेवत स्वतःच्या कार्यकर्तुत्वाने स्वतःच्या आईवडिलांना थेट कलेक्टर मॅडमने सत्काराला बोलावावं इतक्या मोठ्या यशाला गवसणी घातली .बोलावं तितकं कमी आहे ..
“ जागर स्त्रीशक्तीचा “ म्हणजे नेमके काय असते हेच तर असते..ही गोष्ट एकीचीच नाही ,अनेक सहकारी अधिकारिणींची आहे…
आजच्या महिलानिमित्त जीवनच्या सर्वच क्षेत्रात गगनभरारी घेणार्या समस्त रणरागिणाींना मानाचा मुजरा…
“पंख पसरुन दे जगा संदेश
बहुआयामी स्त्रीत्वाचा नवा आवेश”
©️ पुनम
आयुष्याच्या डायरीतून ..📝
Comments
Post a Comment